Dec. 25 – Jan. 26

डिसेंबर २०२५ – जानेवारी २०२६ |अंक १५७

चित्र 1 आणि 2 – Wolbachia जिवाणूंनी संक्रमित एडिस एजीप्ती डास आणि अशा डासांची पैदास करणारा ब्राझील येथील कारखाना.
चित्र 3 आणि 4 – असे २०० डास असलेल्या अनेक ट्यूब सकाळी लवकर शहरभर नेल्या जातात आणि वेगवेगळ्या भागात ते डास सोडले जातात.
२०२५ साली केलेल्या अशा प्रकारच्या विविध वैज्ञानिक कामांबद्दल वाचा, ‘२०२५मध्ये विज्ञानाला आकार देणाऱ्या दहा व्यक्ती’ या लेखात.
१. कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज
ब्राझिलमध्ये नुकतीच ‘कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज’ ची ‘कॉप 30’ ही तिसावी बैठक झाली.वातावरणातील बदलाला कोण कारणीभूत आहे, त्यासाठी उपाय काय करायला हवेत, त्यासाठी निधी कोणी द्यावा या विषयी यामध्ये साद्यंत चर्चा झाली. या बैठकीच्या आधी यातून काय अपेक्षित आहे याविषयी एक लेख डॉ. प्रियदर्शिनी कर्वे यांनी ‘लोकमत’मध्ये लिहिला होता आणि नंतर या बैठकीतून निष्कर्ष काय निघाला हे सांगणारा लेखही त्यांनी लिहिला. कॉप 30 मुळे मानवी समाजावरील धोका कमी होण्याची आशा जिवंत राहिली, असे सांगणाऱ्या या दोन्ही लेखांच्या लिंक्स सोबत जोडत आहोत.
२. अजब झाडाच्या गजब गोष्टी (PDF)
कथा
लेखक : शरद जोशी
एक झाड होतं. जुनंपुराणं. अगदी पोचलेलं साहित्य समीक्षक. त्याची साहित्यातली रुचीही एकदम क्लासिकल. साहित्यातल्या नवीन प्रवाहाविषयी विचारलं, तर एकदम गप्प होऊन जाई ते. पण का? शरद जोशींची ही खूप जुनी, पण ‘नवी’ व्यंगकथा वाचा, आणि या गुपिताचा उलगडा करून घ्या.
(कळीचे शब्द : कथा)
३. डार्क एनर्जी, ब्लॅक हॉल आणि सुपर रेडिएन्ट बॉम्ब – डॉ. दधिच यांचे कार्य
लेखक : विनय र. र.
डॉ. नरेश दधिच हे भारतातील एक प्रसिद्ध सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांचे संशोधन मुख्यतः सामान्य सापेक्षतावाद, गुरुत्वाकर्षण, कृष्णविवरे आणि ब्रह्मांडशास्त्र यावर केंद्रित होते. ते खगोलभौतिकी आणि क्वांटम गुरुत्व या क्षेत्रातील आघाडीचे संशोधक होते. त्यांचे योगदान भारतातील विज्ञान क्षेत्राला का्म प्रेरणादायी राहील. त्यांच्या कार्याचा विनय र. र. यांनी करून दिलेला परिचय वाचू या ‘डार्क एनर्जी, ब्लॅक होल आणि सुपर रेडियन्ट बॉम्ब – डॉ. दधिच यांचे कार्य’ या लेखात.
(कळीचे शब्द : डॉ. नरेश दधिच, डार्क एनर्जी, कृष्णविवर, इव्हेन्ट होरायझेन, मॅग्नेटिक पेनरोझ प्रोसेस, ब्लॅक होते बॉम्ब)
४. २०२५मध्ये विज्ञानाला आकार देणाऱ्या दहा व्यक्ती
लेखक – नीलिमा सहस्रबुद्धे
२०२५ मधलं वैज्ञानिकाचं गेल्या वर्षभरातील काम पाहून नेचर नावाच्या प्रतिष्ठित मासिकात पहिल्या दहा कामांची माहिती देणारा ‘Nature’s 10 in 2025’. हा लेख आला आहे. त्या संबंधी माहिती पाठवत आहोत. ‘२०२५ मध्ये विज्ञानाला आकार देणाऱ्या दहा व्यक्ती’ या अफलातून कामाविषयीचा लेख मुळातूनच वाचायला हवा. त्यासाठी खाली त्याची लिंक दिलेली आहे.
(कळीचे शब्द : २०२५ मधील विज्ञान)
५. इतिहासातील अंधारी भुयारं, तळघरं आणि त्यातून जाणारी मुलं (PDF)
लेखक – प्रकाश कांत
इतिहासात असतात सनावळ्या आणि वंशवळ्या.. किती तारखा आणि राजवंश लक्षात ठेवणार .. म्हणूनच इतिहास शिकायचा कंटाळा येतो. पण याखेरीज जुन्या वस्तू ,भांडी, उत्खननात सापडलेल्या गोष्टीं अशा पुराव्यांमधूनही इतिहास रंजकतेने शिकता येतो. कसा, ते जाणून घेऊ या ‘इतिहासातील अंधारी भुयारं, तळघरं आणि त्यातून जाणारी मुलं’ या प्रकाश कांत यांच्या लेखातून.
(कळीचे शब्द : इतिहास, इतिहास लेखन, इतिहासाची पुस्तके, सामाजिक शास्त्र, इतिहासाची साधने)
६. मुळा – मुठा पाणलोटक्षेत्रातील निसर्गसंपत्तीचे आर्थिक मूल्य | पुणे रिव्हर रिव्हायवल
मुळा मुठा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रातून पुणे जिल्ह्याला दरवर्षी साधारण रू. ५००० कोटी इतका आर्थिक लाभ मिळतो. या नद्यांच्या ४४ कि.मी. लांबीच्या दोन्ही किनारपट्ट्यांवर होत असलेल्या सुशोभीकरण प्रकल्पांमुळे या निसर्गसंपदेचे अनन्वित व भरून न निघणारे नुकसान होणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधील संशोधक प्रा. टी.व्ही. रामचंद्र व त्यांच्या विद्यार्थ्यांनी पुणे रिव्हर रिव्हायवल गटासाठी केलेल्या अभ्यासातून धक्कादायक आकडेवारी पुढे आलेली आहे. शासकीय यंत्रणेचे सिमेंटवरचे प्रेम पुणे जिल्ह्यासाठी किती नुकसान करणारे आहे, हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ जरूर पहा.
७. लिन मार्ग्युलिस : ‘सहजीवनातून उत्क्रांती’ चा सिद्धांत मांडणाऱ्या शास्त्रज्ञ (PDF)
संकलक – यशश्री पुणेकर
विज्ञानाकडे पाहण्याचा मानवकेंद्रित नसलेला समन्वयवादी दृष्टिकोन असलेल्या लिन मार्ग्युलिस यांनी सिद्ध केले की निसर्गात टिकून राहण्यासाठी केवळ बलवान असणे पुरेसे नाही तर एकमेकांशी जुळवून घेणे हेच खरे उत्क्रांतीचे रहस्य आहे. सुरुवातीला विरोध झालेला हा सिद्धांत नंतर मात्र अनेक पुराव्यांसह सिद्ध झाला. त्यांच्या या सिद्धांताविषयी आणि एकूण कार्याविषयी जाणून घेऊ ‘लिन मार्गुलिस : ‘सहजीवनातून उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणाऱ्या शास्त्रज्ञ’ या लेखातून.
(कळीचे शब्द : एंडोसिंबायोटिक सिद्धांत, गाया सिद्धांत, उत्क्रांती, सहजीवन, मायटोकाँड्रिया, क्लोरोप्लास्ट)

थोर पर्यावरण शास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांना विनम्र श्रद्धांजली
थोर पर्यावरण शास्त्रज्ञ माधव गाडगीळ म्हणत असत ‘ भारताचे 70 % लोक गावात राहणारे, उपजीविकेसाठी निसर्गावर अवलंबून राहणारे परिजन आहेत, आर्थिक सुस्थितीतले शहरातले 15 % उर्वीजन आहेत तर 15 % निसर्गापासून दूर हुसकावल्याने शहरात झोपडपट्टीत राहणारे परिविस्थापित आहेत. उर्वीजनांची निरंकुश भूक भागवायला जो तथाकथित विकास केला जातो, त्यात परिजनांची वाताहात होऊन परिविस्थापितांची संख्या फुगत चालली आहे.’ सह्याद्रीच्या जैवविविधतेच्या रक्षणाची तळमळ, आणि निसर्गविज्ञानाशी संबंधित विषय अतिशय सोप्या मराठी भाषेत सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याची हातोटी असलेल्या माधव गाडगीळ यांना विनम्र श्रद्धांजली.
अंक १५७ कव्हर चित्रे संदर्भ :