Issue 159

posted in: 2026, Sandarbh Issues | 0

Apr. – May 26

मुखपृष्ठाविषयी: यंत्रमानवांच्या युगात एकावर एक कापडाचे तुकडे ठेवून, ते जोडून कपडे शिवणारे यंत्रमानव तयार करणं अवघड काम होतं. ते आता शास्त्रज्ञांनी साध्य केलं आहे. कापडाचे तुकडे एकमेकांना चिकटवून मग ते शिवणारे ‘रोबो-टॉप’(Robo-top) नावाचे शिलाई यंत्र अमेरिकेतील CreateMe या कंपनीने तयार केले आहे तर कापडाचे मापात कापलेले तुकडे पॉलिमरच्या द्रावणात बुडवून कडक करायचे आणि मग ते यंत्रमानव शिवू शकेल; असा ‘स्यूबो’ (Sewbo) यंत्रमानव अमेरिकेतीलच दुसऱ्या कंपनीने तयार केला आहे. शिलाई यंत्रावर हजारो कामगारांच्या हाताने शिवले जाणारे कपडे जर यंत्रमानव शिवू लागले, तर ती शिलाईच्या इतिहासातील क्रांती ठरेल! त्यातून भले होईल की बुरे हे मात्र आत्ता सांगता येणार नाही. यातील स्यूबो रोबोटिक शिलाई यंत्राचे चित्र मुखपृष्ठावर दिले आहे.
नैसर्गिक गोष्टींपासून सुया तयार करून कपडे शिवणे आणि पुढे शिलाई यंत्राचा शोध व त्यातील सुधारणा याविषयीचा रंजक इतिहास वाचा लेख : ‘शिलाईचा आणि शिलाई यंत्राचा इतिहास’.

१. ‘सीमापार’

कथा

लेखक : तृष्णा बसाक, अनुवाद: संजीवनी आफळे

नव्या पिढीला जागा हवी म्हणून जुन्या पिढीने जायला हवं .. पण कुठे? वृद्धाश्रम, वानप्रस्थ का सीमापार? भविष्यात वृद्ध कुठे जातील या विषयीची ही कथा वाचून आपल्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात. कारण आज जी कल्पित विज्ञानकथा वाटते, ती उद्याचे सत्य असते. मानव आणि यंत्रमानव यांच्या संबंधांवर आधारित तृष्णा बसाक यांची संजीवनी आफळे यांनी अनुवाद केलेली ‘सीमापार’ ही कथा अवश्य वाचा.

(कळीचे शब्द : कथा, ह्युमनॉइड)

२. हे वाचलेत का?
“A Sixth of Humanity: Independent India’s Development”

पुस्तक टिप्पणी

देशाचा जो भव्य विकास दाखवला जातो तो नैसर्गिक आणि सामाजिक भांडवलाचं कधीही न भरून निघणारं नुकसान करून केला जातो. याविषयी एका पुस्तकाबद्दल केरळमध्ये कार्यरत असलेले पर्यावरणवादी के. सहदेवन यांची एक पोस्ट होती. त्यांनी जे मांडले आहे, ते आपण सगळयांनी विचार करण्यासारखे वाटले, म्हणून हा अनुवाद इथे देत आहोत.

(कळीचे शब्द : सकल राष्ट्रीय उत्पादन, खाउजा (खाजगीकरण-उदारीकरण-जागतिकीकरण), आर्थिक निर्देशक)

३. “Apollo v Artemis: How the Earth changed in 58 years

www.bbc.com

अपोलो 1968 ते आर्टेमिस 2026. या दोन फोटोंमधल्या काळात पृथ्वी किती बदलली आहे याबद्दल बीबीसी वरती एक लेख आला आहे. (19 एप्रिल 26, रिचर्ड हॉलिंगहॅम).

1968 मध्ये अपोलो 8ने काढलेल्या फोटोबद्दल त्यातील अवकाश वीराने म्हटले होते ” पूर्ण विश्वाच्या निरंगी पार्श्वभूमीवर, नुसते दगड माती भरलेल्या त्या उदास क्षितिजावर उगवणारी रंगीत निळसर पृथ्वी अचानक दृष्टीस पडली. पूर्ण काळपट विश्वाच्या पसाऱ्यात हे एकमेव रंगीत जीवन होते! इथे जन्माला येणं, इथे राहणं हे फार मोठं भाग्य आहे!” लवकरच 1970 ला अर्थ-डे ही कल्पना प्रत्यक्षात आली.

58 वर्षांनी (सहा एप्रिल 26) हा फोटो प्रसिद्ध झालाय. हे दोन्ही फोटो मिळून आपल्याला काहीतरी सांगत आहेत. 1960 मध्ये वातावरणामध्ये कार्बन डाय-ऑक्साइड 320 पीपीएम होता आणि 2026 ला आज तो जवळजवळ 426 पीपीएम आहे. म्हणजे एक तृतीयांश ने प्रमाण वाढलेले आहे. ग्लोबल टेंपरेचर एक डिग्री सेल्सिअस ने वाढलेले आहे. माणसाने केलेल्या तथाकथित विकासामुळे शहरे वाढली, जंगले कमी झालेली दिसतात. शेतजमीन (उजळ) दिसते, ती वाढलेली आहे. 1960 मध्ये होता त्याच्यापेक्षा अरल समुद्र वाळून गेला आणि दहा टक्केच शिल्लक राहिला. अंटार्टिका वेगाने उष्ण होत चाललेला आहे. या दोन प्रतिमांमध्ये असे दिसते की 28 हजार किलोमीटर मधला हिमसाठा वितळून गेलेला आहे. सर्व पृथ्वीवरचा हिमसाठा कमी होत चालला आहे…आणि आपण काय करतो आहे? रोजच्या जगण्यात, भवतालात, राजकारणात – ‘micro’ पातळीवर एकमेकांशी झुंजतो आहे! ‘मॅक्रो’ लेव्हलचे संकट आपल्याला दिसते आहे… त्याकडे पाठ फिरवतो आहोत! या पार्श्वभूमीवर पुढल्या महिन्यापासून प्रियदर्शिनी कर्वे यांची ‘वातावरण बदलाचे राजकारण’ ही लेखमाला आवर्जून वाचू या. आता बीबीसी च्या लेखाची लिंक देत आहोत.

४. शिलाईचा आणि शिलाई यंत्राचा इतिहास

संकलन : संजीवनी आफळे

शिवणकला ही अतिशय प्राचीन कला हजारो वर्षांपासून मानवी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. कातड्याच्या, पानांच्या, कापडाच्या, हाताने शिवलेल्या कपड्यांपासून ते अत्याधुनिक जटील यंत्रसामुग्रीच्या साह्याने आधुनिक कापड उद्योगापर्यंत शिवणकामातून फक्त उपयुक्तताच नाही तर मानवाचं सर्जनशील रूप देखील व्यक्त झालेलं आहे. त्याबद्दल जाणून घेऊ या ‘शिलाईचा आणि शिलाईयंत्राचा इतिहास’ या संजीवनी आफळे यांनी संकलित केलेल्या लेखात.

(कळीचे शब्द : होमो सेपियन्स, कपड्यांचा इतिहास, शिलाई यंत्राचा इतिहास)

५. गणित शिकवताना मूल्य संवर्धन

लेखक : किरण बर्वे

गणितात नियम हे सर्वच संबंधित घटकांसाठी समान असतात, हीच गोष्ट व्यवहाराशी जोडून समाजातसुद्धा नियम सर्वाना समान असावेत, ही भावना पोहोचवणे शक्य आहे. गणितातल्या व्याख्या आणि क्रिया सामाजिक परिस्थितीला जोडून काही मूल्यविचार मुलांपर्यंत पोहोचवता आले तर? असा विचार मांडणारा लेख अवश्य वाचा, ‘गणित शिकवताना मूल्य संवर्धन’ हा किरण बर्वे यांचा लेख.

(कळीचे शब्द : गणित, गणितातले नियम, गणितातली चिन्हे आणि त्यांचे अर्थ, गणित शिकवताना मूल्यसंवर्धन)


अंकातील इतर सर्व चित्रे इंटरनेटवरून साभार.

चित्र संदर्भ :

https://www.bbc.com/news/articles/c0q2gkj97eko

https://hackaday.com/2016/09/12/sewbo-robot-sews-up-automated-garment-manufacturing/