Issue 160

posted in: 2026, Sandarbh Issues | 0

Jun. – Jul. 26

मुखपृष्ठाविषयी: नौकानयन करताना अचूक मार्गक्रमणाकरीता वापरल्या जाणाऱ्या मर्केटर प्रक्षेपणाच्या नकाशामध्ये विषुववृत्तापासून दूर असलेले प्रदेश प्रमाणाबाहेर मोठे दिसतात, तर विषुववृत्ताजवळील आफ्रिका लहान दिसतो. आफ्रिकन युनियनने या नकाशाला हरकत घेतली आणि २०२५मध्ये त्यांनी ‘करेक्ट द मॅप’ ही मोहीम राबवून जगाच्या ‘मर्केटर प्रक्षेपण नकाशा’ ऐवजी ‘इक्वल अर्थ प्रोजेक्शन’ हा नकाशा वापरावा असं मत जगापुढे मांडलं आहे. या नकाशामध्ये सर्व भूभागांचे योग्य ते आकार दिसत आहेत. मुखपृष्ठावरील चित्रामध्ये हे दोन्ही नकाशे दिसत आहेत. नकाशे काढताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात, या विषयावरील लेख वाचा :- ‘वाचा, पहा – नकाशे काढताना’

चित्र संदर्भ : https://www.zmescience.com/science/news-science/the-world-we-learned-in-school-is-wildly-misleading-and-africa-wants-it-gone/

१. वातावरण बदल – कारणे व परिणाम

जागतिक तापमानवाढ आणि भवतीचे राजकारण – भाग १

लेखक : डॉ. प्रियदर्शिनी कर्वे

आज जागतिक तापमानवाढ आणि वातावरण बदलामागील वैज्ञानिक आणि आर्थिक मुद्द्यांची बरीच चर्चा होते, पण राजकीय आणि सामाजिक न्यायाच्या बाबतीत पुरेशी चर्चा होत नाही. याच अनुषंगाने नाशिकच्या डॉ. नरेंद्र दाभोळकर विवेक व्याख्यानमालेमध्ये २० नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या डॉ. प्रियदर्शिनी कर्वे यांच्या व्याख्यानाची ही लेखमाला म्हणजे या दुर्लक्षित विषयावर प्रकाश टाकण्याचा एक प्रयत्न आहे. तेव्हापासून मागील पाच-सहा महिन्यांतील घडामोडींची जोड देऊन ही लेखमाला लिहिली आहे. वाचा या लेखमालेचा पहिला लेख – वातावरण बदल – कारणे आणि परिणाम.

(कळीचे शब्द : जागतिक तापमानवाढ, हरितवायू परिणाम, हिमनद्या, वातावरण बदल आणि त्याचे परिणाम, नीलहरित जिवाणू)

२. गोष्टी ईश्वराच्या

लेखक : विष्णू नागर

अनुवाद : संजीवनी आफळे

तुम्हाला ईश्वर भेटला तर? असा निबंध आपण शाळेत असताना लिहिलेला तुम्हाला आठवत असेल. इथेही एका छोट्या मुलाला एकदा ईश्वर भेटला म्हणे. काय विचारलं त्याने ईश्वराला.. तो तरी त्याच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकला का? वाचा विष्णू नागर यांच्या ‘गोष्टी ईश्वराच्या’ या संजीवनी आफळे यांनी अनुवादित केलेल्या कथेत.

(कळीचे शब्द : कथा)

३. माझा गुगल सर्च पृथ्वीला तापवतोय

(आपली इंटरनेटवरील कार्बन फूटप्रिंट)

लेखक : मकरंद म्हैसकर

संगणक किंवा मोबाईल वापरुन आपण इंटरनेटवर जे काही पाहतो,ऐकतो, मेल पाठवतो,गेम्स खेळतो.. या सर्व गोष्टींसाठी डेटाची जी देवाणघेवाण होते,त्यातून खर्च होणारी ऊर्जा म्हणजे आपली इंटरनेटवरची कार्बन फूटप्रिंट. ही फूटप्रिंट कशी मोजायची, ती कमी करण्याचे काय उपाय आहेत हे जाणून घेऊ या.. ‘माझा गुगल सर्च पृथ्वीला तापवतोय! (आपली इंटरनेटवरील कार्बन फूटप्रिंट)’ या मकरंद म्हैसकर यांच्या लेखातून.

(कळीचे शब्द : कार्बन फूटप्रिंट, जागतिक तापमानवाढ, आपली फिजिकल कार्बन फूटप्रिंट, इंटरनेटवरची कार्बन फूटप्रिंट व ती कमी करण्याचे उपाय, गुगल सर्च, इंटरनेट सर्च, कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणे, वेबसाईट वापरणे या क्रियांची कार्बन फूटप्रिंट)

४. पवनचक्क्या आणि स्थानिक पर्यावरण

लेखक : किशोर पंवार, श्वेता भावसार

वीज निर्मितीसाठी पवनऊर्जेचा वापर सुरू होऊन दोन दशकं होऊन गेली. सातारा जिल्ह्यात चाळकेवाडी इथे खूप मोठ्या प्रमाणात पवनचक्क्या उभारल्या गेल्या. सुरुवातीला त्याचा फायदा झाला तरी काही काळानंतर त्याचे दुष्परिणाम जाणवायला लागले आहेत. तिथल्या पावसावर, अन्नसाखळीवर तसंच इतर पर्यावरणावर काय परिणाम झाले आहेत ते जाणून घेऊ या ‘पवनचक्क्या आणि स्थानिक पर्यावरण’ या किशोर पंवार आणि श्रुती भावसार यांच्या लेखात.

(कळीचे शब्द : पवनऊर्जा, पवनचक्क्या, विंड फार्म, पवनचक्क्या आणि स्थानिक पर्यावरण)

५. वाचा पहा – नकाशे काढताना

नकाशा दिशादर्शक असतो. एखाद्या प्रदेशाचे अचूक स्थान दर्शवतो. नकाशा बिनचूक असायला हवा, म्हणूनच नकाशा काढताना काय करावं यासाठी शैक्षणिक संदर्भच्या आधीच्या अंकांमध्ये या विषयावर प्रकाशित झालेल्या काही लेखांच्या लिंक्स देत आहोत. २०२५ पासून ‘इक्वल अर्थ प्रोजेक्शन’ हा नकाशा वापरावा असे सुचवले आहे. त्याच विषयावरील व्हिडिओ नक्की पाहा.

६. यल्लप्रदा सुब्बाराव

विस्मृतीत गेलेले भारतीय शास्त्रज्ञ

लेखक : मोहन गुरुस्वामी

त्यांनी ए. टी. पी.शोध लावला, किमोथेरपीचे पहिले औषध आणि टेट्रासायक्लिन प्रतिजैविकाचा शोध लावला. B 12 ची कमतरता आणि पंडुरोग यांचा संबंध शोधून काढला. लाखो लोकांचे जीव त्यांच्या मुळे वाचले, असे एक महान भारतीय शास्त्रज्ञ यल्लप्रगदा सुब्बाराव. यांच्या जीवनकार्याविषयी जाणून घेऊ या यल्लप्रगदा सुब्बाराव- विस्मृतीत गेलेले भारतीय शास्त्रज्ञ’ या मोहन गुरुस्वामी यांच्या लेखात.

(कळीचे शब्द : भारतीय शास्त्रज्ञ यल्लप्रगदा सुब्बाराव, ए. टी. पी. चा शोध, ओरियोमायसिन, अमीनोप्टेरिन, मिथोट्रिक्सेट)


अंकातील इतर सर्व चित्रे इंटरनेटवरून साभार.